नवी दिल्ली : काही विकसित देशांच्या चुकीच्या धोरणांची किंमत ही विकसनशील आणि गरीब देशांना मोजावी लागत आहे. अशा प्रत्येक विकसित देशाकडे भारताने हवामान न्यायाचा प्रश्न मांडला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपला ध्वनिचित्रमुद्रित संदेश जारी केला. त्यात ते म्हणतात, की जागतिक हवामानाचा दर्जा राखण्यासाठी सर्वच देशांनी स्वार्थत्याग करून विचार केला पाहिजे. दीर्घकाळपासून बडय़ा-विकसित देशांमधील विकासाचे प्रारूप हे वादग्रस्त ठरले आहे. या प्रारूपात असा विचार होता की, आधी आपण देशाचा विकास साधावा आणि नंतर आपल्याला पर्यावरणाचा विचार करता येईल. या विचारातूनच त्यांनी आपले विकासाचे लक्ष्य पूर्ण केले. पण जगभरातील पर्यावरणाला त्यांच्या अशा विकासाची किंमत मोजावी लागली.
ते पुढे म्हणाले, की विकसित राष्ट्रांच्या अशा वृत्तीवर आक्षेप घेण्यासाठी अनेक दशके कोणताही देश पुढे आला नाही. पण अशा सर्व राष्ट्रांना भारताकडून हवामान न्यायाबाबत विचारणा करण्यात आली, याचा मला आनंद वाटतो.
भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीत निसर्ग आणि प्रगती यांचा संगम दिसून येतो. आपल्या देशाने पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या दोघांचेही भान राखल्याने हे शक्य झाले. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान