इस्रायलने शुक्रवारी सकाळी लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्यातील तीन सैनिक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांसह विविध देशांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. अशातच आता भारतानेही या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन सादर करत यासंदर्भात भाष्य केलं आहे.

भारताने नेमकं काय म्हटलंय?

इस्रायलच्या हल्ल्यानंतर ब्लू लाईनवरील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीवरून भारत चिंतेत आहे. येथील घडमोडींवर भारताकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. खरं तर संयुक्त राष्ट्राच्या परिसराच्या अखंडतेचा सर्वच देशांनी आदर करायला हवा. या परिसरातील शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया भारताकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?

लेबनॉनमध्ये ६०० भारतीय सैनिक तैनात

संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेसाठी इस्रायल-लेबनॉन सीमेवर ब्लू लाईन तयार करण्यात आली आहे. त्या ब्लू लाईनवर संयुक्त राष्ट्रे शांती सैन्यातील जवळपास ६०० भारतीय सैनिक तैनात आहेत. या ठिकाणी असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या चौकीवर इस्रायलने हल्ला केला आहे. त्यामुळे भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भारताशिवाय इटली, फ्रान्स आणि इंडोनेशियासारख्या देशांनीही इस्रायलला खडे बोल सुनावले आहेत.

हेही वाचा- इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

इस्रायलने ब्लू लाईनवरील चौकीवर डागले गोळे

दरम्यान, इस्रायलने आज ( शुक्रवारी) सकाळी लेबनानमधील ब्लू लाईनवरील चौकीवर गोळे डागले. यामध्ये इंडोनेशियाचे तीन सैनिक जखमी झाले आहेत. मुळात संयुक्त राष्ट्रांनी दक्षिणी लेबनानमध्ये १० हजार सैनिक तैनात केले आहेत. यात ६०० भारतीय सैनिकही आहेत. संयुक्त राष्ट्राच्या चौकीव्यक्तीरिक्त इस्रायलने गुरुवारी रात्री लेबनॉनची राजधानी बेरूतमधील एका इमारतीवरही हवाई हल्ला केला. या हल्ल्यात २२ नागरिकांचा मृत्यू, तर जवळपास १८० जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.