पाकिस्तानवर आमचा विश्वास असून उभय देशांत शांतता नांदावी यासाठी त्यांना आणखी संधी द्यावी लागेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी येथे केले. एका ऑस्ट्रेलियन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
ते म्हणाले, पाकिस्तानला भारतासोबत चांगले संबंध आणि शांतता हवी आहे, असे वक्तव्य त्यांचे पंतप्रधान नवाझ शरीफ वारंवार करीत आहेत, आमचा त्यांच्या शब्दांवर विश्वास आहे. भारतीय उपखंडात शांतता नांदावी यासाठी पाकिस्तानसोबत दीर्घ काळापासून चर्चा सुरू आहे. या चर्चेत पाकिस्तानकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मात्र सीमेवर घडणाऱ्या घटनांमुळे या चर्चेचे फलित नकारात्मकच ठरते. अर्थात अंतर्गत समस्यांनी घेरले असल्याने त्यांना आणखी संधी द्यायला हवी. एकप्रकारे त्यांना संशयाचा फायदा देणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. मात्र ही संधी देताना ते आमच्या मुळाशी येणार नाही, हे पाहावे लागेल.
पाकिस्तानच्या आशीर्वादाने काश्मीर आणि अन्य ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा त्यांनी यावेळी निषेध केला. पाकिस्तानच्या एका गटाकडून लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनेला प्रोत्साहन दिले जाते. हे दहशतवादी काश्मीर आणि अन्य ठिकाणी निरपराध लोकांचे बळी घेतात, हे सत्र पाकिस्तानने त्वरित थांबविण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
‘त्या’ बैठकीला मुहूर्त नाही
पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या पाच जवानांची ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजेच दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सीमा भागातील तणाव दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, यावर न्यू यॉर्क येथे उभय देशांच्या पंतप्रधानांमध्ये एकमत झाले  होते, मात्र त्या बैठकीला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.

Story img Loader