दिवसभरात देशात १८,७३२ बाधित
नवी दिल्ली : नव्या करोनावतारामुळे जगभरात चिंतेचे मळभ असताना भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १८,७३२ रुग्ण आढळले. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णवाढ आहे.
देशभरात आतापर्यंत ९७,६१५३८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ९५.८२ टक्के आहे. दिवसभरात २७९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींचा आकडा १,४७,६२२ वर पोहोचला आहे. करोनाबळींचे हे प्रमाण १.४४ टक्के आहे. देशभरात सध्या २,७८,६९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २.७३ टक्के आहे.
याआधी १ जुलै रोजी करोनाचे १८,६५३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर देशात मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत होती. दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण एक लाखाच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. मात्र, दोन महिन्यांपासून दैनंदिन रुग्णवाढ कमी होत असून, रविवारी रुग्णवाढीने सहा महिन्यांतील नीचांक नोंदवला.
देशाची रुग्णसंख्या एक कोटीहून अधिक झाली असून, ७ ऑगस्टला २० लाख, २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाख रुग्णसंख्येचा टप्पा पार झाला होता. त्यानंतर १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख आणि २० नोव्हेंबरला ९० लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला होता.
‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची लस नव्या करोनावरही गुणकारी ठरेल’
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या लशीत करोनाविरोधात अत्यंत परिणामकारक घटक आहेत. ही लस करोनाच्या नव्या अवतारावरही परिणामकारक ठरेल, असा आशावाद अॅस्ट्राझेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिअट यांनी व्यक्त केला. ऑक्सफर्डच्या लशीला ब्रिटनमध्ये लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात ३,३१४ नवे रुग्ण
राज्यात रविवारी करोनाचे ३,३१४ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १९,१९,५५० वर पोहोचली आहे. दिवसभरात ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची एकूण संख्या ४९,२५५ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २,१२४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १८,०९,९४८ वर पोहोचली असून, सध्या ५९,२१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात करोनामुक्तांचे प्रमाण ९४.२९ टक्के तर करोनाबळींचे प्रमाण २.५७ टक्के आहे.