करोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चे रुग्ण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दुसऱ्या बाजूला देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. संपूर्ण भारतात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरात एकूण ३२८ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी २६५ रुग्ण केरळमधले आहेत.
एका बाजूला केरळमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटलं आहे की, “सध्याची ही आकडेवारी फारशी चिंताजनक नाही. कारण, करोनाशी लढण्यासाठी आपली आरोग्यव्यवस्था सक्षम आहे.” दरम्यान, केरळपाठोपाठ उत्तर प्रदेशातही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिल्लीत बुधवारी केवळ चार करोनाबाधित रुग्ण होते जे गुरुवारी सात झाले आहेत. यापैकी चार रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
दरम्यान, ‘जेएन.१’चा एक रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराशी सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल १०२ रुग्ण आढळले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.
हे ही वाचा >> महाराष्ट्रात लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार; देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल
सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्यात ९६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याआधीच्या आठवड्यात ७६३ रुग्ण आढळले होते. यापैकी बहुसंख्य रुग्णांची परिस्थिती नाजूक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. सिंगापूरमधील वृत्तपत्र ‘टुडे’ने म्हटलं आहे की, या करोनाबाधित रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण हे जेएन.१ विषाणूने संक्रमित झालेले आहेत.