भारतात एकीकडे करोना रुग्णसंख्या उच्चांक गाठत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही काळजी वाढवणारी आहे. गुरुवारी एकीकडे देशात ४ लाख १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असताना ३९२७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे. फक्त गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

१० दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अमेरिकेत १० दिवसांत सर्वाधिक ३४ हजार ७९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर ब्राझीलचा क्रमांक होता. ब्राझीलमध्ये ३२ हजार ६९२ मृत्यू झाले होते. पण भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकलं असून नकोसा उच्चांक नावावर झाला आहे.

दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांच्या पुढे गेली आहे. बुधवारी ४ लाख १२ हजार ७८४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी ४ लाख १४ हजार ५५४ नवे रुग्ण आढळले. २४ तासांत १३ हून अधिक राज्यांनी १०० हून अधिक मृत्यू झाल्याची नोंद केली होती. यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असणाऱ्या उत्तराखंडचाही समावेश होता. कुंभमेळ्याचं आयोजन केलेल्या उत्तराखंडमध्ये १५१ जणांचे मृत्यू झाले.

महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून २४ तासांत ८५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये ३०० हून अधिक तर छत्तीसगडमध्ये २०० हून अधिक मृत्यू झाले. दरम्यान १०० हून अधिक मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये उत्तराखंडसोबत तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पंजाब, झारखंड, गुजरात आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

Story img Loader