तमिळनाडूतील कुडनकुलम येथील आण्विक ऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात करार होणार आहे. चीनने पाकिस्तानला दोन अणुभट्टय़ा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर २४ तासांच्या आत भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान पुढील आठवडय़ात या करारावर स्वाक्षऱ्या होतील. या दोन देशांमध्ये आण्विक दायित्वावरून काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याबाबत चर्चेने मार्ग काढला जाणार आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अणुभट्टय़ांची निर्मिती पाहता हे करार होतील. तसेच आण्विक दायित्वाबाबत कोणताही पेच निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कापरेरेशन कंपनी विमा आणि इतर मुद्दय़ांवर प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारत या संदर्भात मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुरवठादार जर परदेशी किंवा स्थानिक असेल विम्याचे कवच देणे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आम्ही अणुभट्टय़ा चालवणारे आहोत. याची जबाबदारी आमच्यावर कशी, असा प्रश्न रशियाला केल्याचे भारताकडून सांगण्यात आले. धोका पाहता रशियाला या संदर्भात स्पष्टता हवी आहे.
आण्विक सहकार्याखेरीज रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधाचा इतिहास पाहता सामरिक तसेच राजकीय पातळीवर हे संबंध दृढ व्हावेत यासाठी पंतप्रधानांच्या दौऱ्यात प्रयत्न केले जाणार आहेत.
दरम्यान, मनमोहन सिंग चीनलाही भेट देणार आहेत. त्यामध्ये ते सीमा सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करतील. त्यामुळे तणावाचे प्रसंग टाळले जातील, अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या कराराला संमती देण्यात आली.
ब्राह्मोससाठी करार
ब्राह्मोस शक्तिशाली क्षेपणास्त्र (ध्वनिवेगातीत) निर्मितीबाबत कराराचा कालावधी दोन देशांची इच्छा असेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने याला मान्यता दिली. या संदर्भात १९९८ मध्ये पंधरा वर्षांचा करार झाला होता. तो या वर्षी फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र त्यास आता दीर्घ स्वरूपाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रनिर्मिती दोन्ही देशांनी संयुक्तपणे केली आहे.

Story img Loader