पीटीआय, वॉशिंग्टन
चीनबरोबरील सीमावादावर भारताने तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप पुन्हा एकदा धुडकावला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सीमावाद सुटण्यामध्ये त्यांची काही मदत होत असेल, तर ती देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी अशा समस्यांसाठी भारताने कायमच द्विस्तरावरील दृष्टिकोन ठेवला आहे, असे स्पष्टीकरण दिले. कुठल्याही देशाबरोबरील समस्येमध्ये तिसऱ्या देशाची कुठलीच भूमिका नसेल, असे मिस्राी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत कोणीही द्विपक्षीय संबंधांमध्ये चीनला मुद्दा बनवू नये तसेच त्यामुळे दुसऱ्या देशाचे हितसंबंध बिघडू नयेत असे म्हटले आहे. मोदी-ट्रम्प चर्चेनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही देशांनी भारत-अमेरिका संरक्षण संबंध पुढे नेण्यास सहमती दर्शविल्याचे यात म्हटले आहे. २१ व्या शतकासाठी ‘यूएस-इंडिया कॉम्पॅक्ट’ (लष्करी भागीदारी, वाणिज्य आणि तंत्रज्ञानासाठी संधी) हा नवा उपक्रम सुरू केल्याचा उल्लेखही केला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुवो जियाकुन यांनी म्हटले आहे.

Story img Loader