टोरंटो : हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय हस्तकांचा सहभाग असल्याच्या आरोपासंदर्भात कॅनडाने अनेक आठवडय़ांपूर्वी सबळ पुरावे भारताला सुपूर्द केले होते. भारत या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कॅनडासह कटिबद्धतेने काम करेल, अशी आमची अपेक्षा असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे. परंतु, भारताच्या परराष्ट्र खात्याने हा दावा फेटाळला असून, कॅनडाकडून अशी कोणतीही विशिष्ट माहिती मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
१८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली. या हत्येमध्ये भारतीय हस्तकांचा (एजंट) सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला आहे. या आरोपांमुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील राजकीय वाद निर्माण झाला असून, उभय देशांत तणाव निर्माण झाला आहे. भारताने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. भारताने मात्र कॅनडाचे आरोप आक्रमक पद्धतीने फेटाळताना, हे आरोप निराधार आणि विशिष्ट हेतूंनी प्रेरित असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
कॅनडाने एका भारतीय मुत्सद्दी अधिकाऱ्याला या प्रकरणावरून देश सोडण्यास सांगितले. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही कॅनडाच्या एका वरिष्ठ मुत्सद्याची हकालपट्टी केली.
ट्रुडो यांनी शुक्रवारी कॅनडाच्या दौऱ्यावर असलेले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सांगितले, की मला एवढेच सांगायचे आहे की आम्ही या आरोपांचा आधार असलेले विश्वसनीय पुरावे काही आठवडय़ापूर्वी भारताला सुपूर्द केले आहेत.
सहकार्याची अपेक्षा
ते पुढे म्हणाले की, या संदर्भात आम्ही भारताबरोबर वाटाघाटी करत आहोत. या घटनेमागील तथ्यांची पाळेमुळे शोधण्यासाठी भारताने कॅनडासह कटिबद्धतेने काम करावे अशी आमची अपेक्षा आहे. या मुद्दय़ावर अनेक आठवडय़ांपासून आम्ही काम करीत आहोत. आम्ही या संदर्भात भारताला सहकार्य करण्यास तयार आहोत. मी सोमवारी ज्या विश्वासार्ह आरोपांबद्दल बोललो, ते कॅनडाने भारताला दिले आहेत. आम्हाला आशा आहे की ते (भारत) आमच्याशी याविषयी चर्चा करतील. जेणेकरून आम्ही या अत्यंत गंभीर प्रकरणाचा छडा लावू.
कॅनडाकडून ठोस माहिती नाही; भारताचे स्पष्टीकरण
कॅनडाने निज्जरप्रकरणी भारताला माहिती सुपूर्द केली आहे का, असे विचारले असता, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले, की कॅनडाने या प्रकरणाची कोणतीही विशिष्ट माहिती तेव्हा किंवा नंतर दिलेली नाही. अशी विशिष्ट माहिती मिळाल्यास त्यावर विचार करण्यास आम्ही तयार आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केले.
कॅनडाकडून कारवाई नाही
कॅनडात काही लोकांनी केलेल्या भारतविरोधी गुन्हेगारी कारवायांचे ठोस पुरावे भारताकडे आहेत आणि ते कॅनडाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सुपूर्द केले आहेत. या फुटीरतावाद्यांवर कॅनडाने कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचा प्रत्यारोप भारताने केला आहे.