देशभरात करोना महामारीची तिसरी लाट आली आहे. दैनंदिन रूग्ण संख्येने आता दोन लाखांचा टप्पा देखील पार केलेला आहे. शिवाय, ओमायक्रॉनबाधित रूग्ण देखील आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून निर्बंध कडक केले जात आहेत. संसर्ग वाढू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी देखील दररोज मोठ्या संख्येने नवीन रूग्णांची नोंद सुरूच आहे.
मागील २४ तासांमध्ये देशभरात २ लाख ३८ हजार ०१८ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ३१० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आज समोर आलेली नवीन करोनाबाधितांची संख्या ही कालच्या रूग्ण संख्येपेक्षा २० हजार ७१ ने कमी आहे. तर, मागील २४ तासांमध्ये देशात १ लाख ५७ हजार ४२१ जण करोनातून बरे देखील झाले आहेत.
देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १७,३६,६२८ असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १४.४३ टक्के आहे. याशिवाय, देशात ८ हजार ८९१ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनच्या रूग्णसंख्येत कालपेक्षा ८.३१ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.