देशभरातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. त्यामुळे करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. तर, दुसऱ्या बाजूला करोनातून रोज बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आढळून येत असल्याने, काहीसा दिलासा मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनातुन बरे झालेल्यांची संख्या ही अधिक दिसून आली आहे. मागील २४ तासांमध्येही देशात ३० हजार ९४८ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

देशातील एकूण बाधितांची एकूण संख्या ३,२४,२४,२३४ झाली आहे. आजपर्यंत देशात ३,१६,३६,४६९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३,५३,३९८ असून, आजपर्यंत देशात ४,३४,३६७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

देशात आजपर्यंत ५८,१४,८९,३७७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी मागील ५२,२३,६१२ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झाले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट पर्यंत देशात ५०,६२,५६,२३९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी १५,८५,६८१ नमुन्यांची काल तपासणी केली गेली, अशी माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आलेली आहे.

‘झायडस’च्या लशीस महिन्याची प्रतीक्षा

दरम्यान,झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ह डी’ लशीला मान्यता मिळाली असली तरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध केली जाईल, अशी माहिती झायडस समूहाने शनिवारी आयोजित केलेल्या वेबसंवादात दिली. त्यामुळे मुलांच्या लसीकरणासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.