देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या व करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत भर पडतच आहे. दररोज समोर येणारी देशभरातील करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासात देशभरात ४४ हजार ४५९ रूग्ण करोनातू बरे झाले असून, ४३ हजार ३९३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, देशात ९११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

याचबरोबर देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे. आजपर्यंत देशात २,९८,८८,२८४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर ४,०५,९३९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. आजपर्यंत देशात ३६,८९,९१,२२२ जणांचे लसीकरण झालेले आहे. यापैकी ४०,२३,१७३ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झालेले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात काल(८ जुलै) पर्यंत ४२,७०,१६,६०५ नमुने तपासण्यात आलेले आहेत. यापैकी १७,९०,७०८ नमुन्यांची काल तपासणी केली गेली असल्याची माहिती आयसीएमआर कडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेत केंद्र सरकारने पायाभूत आरोग्य सुविधांसाठी २३ हजार १२३ कोटींच्या मदतीची घोषणा गुरुवारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाविरोधी लढ्याला बळ

‘आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य सुविधांची सुसज्जता’ या योजनेंतर्गत केंद्राकडून १५ हजार कोटी व राज्यांकडून ८,१२३ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पुढील ९ महिन्यांमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

याशिवाय, शिल्लक असलेल्या आणि वापरल्या न गेलेल्या मिळून करोना प्रतिबंधक लशींच्या १.८३ कोटींहून अधिक मात्रा राज्ये व खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले आहे.

करोना लशींच्या १.८३ कोटी मात्रा राज्यांकडे शिल्लक

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना करोना लशीच्या ३७ कोटींहून अधिक (३७,९३,५६,७९०) मात्रा आतापर्यंत पुरवण्यात आल्या असून, आणखी २३ लाख ८० हजार मात्रा त्यांच्यापर्यंत पोहचण्याच्या बेतात आहेत. यापैकी वाया गेलेल्या लशी जमेला धरून एकूण वापर ३६,०९,६९,१२८ मात्रा इतका आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. याचबरोबर, १.८३ कोटींहून अधिक (१,८३,८७,६६२) मात्रा अजूनही राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच खासगी रुग्णालयांकडे देण्यासाठी उपलब्ध आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.

Story img Loader