पीटीआय, संयुक्त राष्ट्रे
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये काश्मीर आणि अनुच्छेद ३७०चा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. भारताविरोधात सीमापार दहशतवादाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील हे पाकिस्तानने समजून घ्यावे अशा कठोर शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सरचिटणीस भाविका मंगलआनंदन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुनावले. जगभरात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या बोटांचे ठसे सापडतील असेही त्या म्हणाल्या.

आमसभेच्या ७९व्या सत्रामध्ये शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या भाषणादरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देण्याच्या अधिकाराअंतर्गत मंगलआनंदन यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ‘‘लष्कराची सत्ता असलेला देश – ज्याला जगभरात दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी ओळखले जाते, त्यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाहीवर टीका करण्याचे औद्धत्य दाखवले. पाकिस्तानने दीर्घकाळापासून आपल्या शेजाऱ्यांविरोधात दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर केला आहे हे जगाला माहित आहे.’’ मंगलआनंदन यांनी यावेळी संसद आणि मुंबईवरील पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचाही उल्लेख केला. अशा देशाने कुठेही हिंसाचाराबद्दल बोलणे हा दांभिकपणा आहे अशी टीका भारताने केली. शरीफ यांनी शुक्रवारी भाषण करताना, अपेक्षेप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. भारताने काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करावे आणि शांततेसाठी चर्चा करावी असे ते म्हणाले होते.