पीटीआय, नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तटस्थ, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले. ‘चोर कधी स्वत:च्या चोरीचा तपास करू शकतो का?’ असा सवाल विचारत केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार आणि जम्मू-काश्मीरच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तटस्थ चौकशी करण्याचा पाकिस्तानी पंतप्रधानांचा प्रस्ताव फेटाळण्यात येत आहे, असे मजुमदार यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांशी बोलताना मजुमदार यांनी या प्रस्तावाला ‘स्वत:ची प्रतिमा वाचवण्याचा हताश प्रयत्न’ असे संबोधून पाकिस्तानचा जोरदार निषेध केला. ‘‘हे लोक कशा प्रकारे चौकशी करणार आहेत? चोर कधी स्वत:च्या चोरीची चौकशी करू शकतो का? पाकिस्तानचे पंतप्रधान भीतीपोटी बोलत आहेत. जेव्हा पाकिस्तानची अपुरी तयारी असते, तेव्हाच आपण त्यांना जोरदार तडाखा देऊ, असे मजुमदार यांनी सांगितले.
ओमर अब्दुल्ला यांनीही पाकिस्तानचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळला. ‘‘प्रथम, त्यांना पहलगाममध्ये काहीतरी घडले आहे हेदेखील कळले नाही. नंतर त्यांनी आरोप केला की भारत त्यामागे आहे. ज्यांनी सुरुवातीला आमच्यावर आरोप केले, त्यांच्या आताच्या विधानांना विश्वासार्हता देणे कठीण आहे. मी त्यांच्या वक्तव्यांना जास्त महत्त्व देऊ इच्छित नाही,’’ असे अब्दुल्ला म्हणाले.
‘थेट प्रक्षेपण टाळा’
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी देशातील सर्व माध्यमांसाठी महत्त्वाच्या सूचना प्रसारित केल्या. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा, लष्कर यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. याबाबतचे थेट प्रक्षेपण किंवा सैन्याच्या हालचालींबाबतच्या बातम्या प्रसारित करू नये, अशी सूचना माध्यमांना करण्यात आली आहे. अशा प्रकारचे वृत्तांकन अनवधानाने शत्रुत्वाच्या घटकांना मदत करू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडून द्विराष्ट्र सिद्धांताचे तुणतुणे
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा द्विराष्ट्र सिद्धांताचा राग आळवला आणि हिंदू आणि मुस्लीम ही दोन वेगवेगळी राष्ट्रे आहेत, असे विधान केले. मुस्लीम समाज सर्व मुद्द्यांवर हिंदू समाजापेक्षा वेगळा आहे. द्विराष्ट्र सिद्धांत हा नेहमीच पाकिस्तानच्या अस्तित्वाचा आधार राहिला आहे. आमच्या संस्थापकांनी स्वत:चे बलिदान देऊन पाकिस्तानची निर्मिती केली, त्यामुळे आमच्या देशाचे रक्षण कसे करायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे, अशी दर्पोक्ती त्यांनी केली.