वृत्तसंस्था, कुर्नूल (आंध्र प्रदेश)
हवाई हल्ले करणाऱ्या लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा धोका निकामी करण्यासाठी भारताने रविवारी संरक्षण तंत्रज्ञानातील महत्त्वाचा टप्पा गाठला. संरक्षण संशोधन आणि विकास परिषदेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ३० किलोवॅटच्या लेझर शस्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक घडवण्यात आले. ही शस्त्र यंत्रणा विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडण्यास सक्षम असून ही क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील ‘नॅशनल ओपन एअर रेंज’ येथे यशस्वी प्रात्यक्षिक केल्यानंतर या यंत्रणेचे उत्पादन आणि तैनातीसाठी ‘डीआरडीओ’ सज्ज आहे. ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे ही क्षमता आहे. त्याशिवाय इस्रायलही ती विकसित करत आहे.

३० किलोवॅट लेझर शस्त्र यंत्रणेची रचना पाच किलोमीटरच्या टप्प्यातील ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई धोक्यांना उत्तर देण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये संभाषण व उपग्रहाचे सिग्नल अवरोधित करण्यासारखी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आहे. तसेच ती हवाई, रेल्वे, रस्ता किंवा सागरी मार्गाने जलदगतीने तैनात करता येऊ शकते.