भारतात मंकीपॉक्स संसर्गानं चिंता वाढवली आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. तो अलीकडेच दुबईहून भारतात परतला होता. मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आल्यानंतर सोमवारी संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित रुग्ण १३ मे रोजी दुबईहून कन्नूरला परतला होता. त्यानंतर त्याच्यात मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. १४ जुलै रोजी कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सच्या पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.
पाहा व्हिडीओ –
देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. तसेच मृत किंवा जिवंत वन्य प्राण्यांचा संपर्क टाळावा. बुशमीट (घुशीसारखा दिसणारा प्राणी) खाणं किंवा तयार करणं टाळावं. याशिवाय आफ्रिकेतील वन्य प्राण्यांपासून बनवलेली क्रीम अथवा लोशन यांसारखी उत्पादनं वापरू नयेत.