मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात आरोपी असलेले डेव्हिड हेडली व त्याचा सहकारी तहव्वुर राणा यांचे जाबजबाब घेण्यासाठी भारताला संधी द्यावी, अशी मागणी भारताने आज केली. हेडली व राणा यांना शिकागो न्यायालयाने दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात महाधिवक्ता एरिक होल्डर यांच्याशी चर्चा केली, त्या वेळी शिंदे यांनी हेडली व राणा यांना भारताला यांचे जाबजबाब घेऊ देण्याचा प्रश्न उपस्थित केला होता.
दोन्ही देशांत कायद्याच्या अंमलबजावणीत मदत व्हावी, गुन्हेगारांचे प्रत्यावर्तन, विनंतिपत्रे, रेड कॉर्नर नोटिसा या मुद्यावर तातडीने निर्णय व्हावेत यासाठी गृह मंत्रालय व न्याय खाते यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे असे मत शिंदे व होल्डर यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा या संघटनेच्या वतीने २६/११च्या हल्ल्यातील ठिकाणांची रेकी करण्याचे काम हेडली याने केले होते, त्याचे जाबजबाब घेण्याची संधी एकदा भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. असे असले तरी पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असलेला राणा, हेडलीची अमेरिकेतील पत्नी शाझिया, त्याची मैत्रीण पोर्टिया पीटर व दुसऱ्या एका मैत्रिणीचे जाबजबाब घेण्याची संधी भारताला मिळालेली नाही.
गृहमंत्री शिंदे यांनी एफबीआयचे संचालक म्युलर यांचीही भेट घेतली त्यात त्यांनी दोन्ही देशांतील सहकार्याच्या प्रश्नांचा आढावा घेतला. एफबीआय व भारतीय सुरक्षा संस्था यांच्यात सहकार्य आणखी वाढवण्याच्या आवश्यकतेवर या वेळी भर देण्यात आला. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षामंत्री जॅनेट नॅपोलिटानो यांच्याशीही शिंदे यांनी चर्चा केली. अंतर्गत सुरक्षा संवादाची पुढची फेरी २०१४मध्ये भारतात होणार आहे.
बोस्टन येथे अलीकडेच मॅरेथॉनच्या वेळी बॉम्बस्फोट झाले होते त्या ठिकाणी शिंदे यांनी भारतीय शिष्टमंडळासह भेट दिले. तेथील यशस्वी तपासाची माहिती या वेळी त्यांना देण्यात आली.

Story img Loader