मुंबईतील २६/११च्या हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली आणि त्याचा साथीदार तहाव्वूर राणा यांची चौकशी करण्यास परवानगी देण्याची मागणी भारताने अमेरिकेकडे केलीये. या दोघांनीही अमेरिकेतील शिकागो येथील न्यायालयाने दहशतवादाच्या गुन्ह्याखाली शिक्षा सुनावलीये. या संदर्भात भारत किंवा अमेरिकेच्या सरकारकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळाली नाही.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या अमेरिका भेटीवेळी तेथील ऍटर्नी जनरल एरिक होल्डर यांच्याकडे हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी भारतीय पथकाने हेडली याची अमेरिकेमध्ये चौकशी केली होती. हेडली याने २६/११च्या हल्ल्याआधी भारतातील काही ठिकाणाची रेकी केली होती. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्करे तैय्यबासाठी ही रेकी करण्यात आली होती, असे अमेरिकेतील तपासात निष्पन्न झाले आहे.
अमेरिकेने तहाव्वूर राणाची चौकशी करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाहीये. हेडलीची अमेरिकास्थित पत्नी शाजिया, त्याची मैत्रिण पोर्टिया पीटर यांचीही चौकशी अद्याप भारतीय पथकाने केलेली नाही. या सगळ्यांची चौकशी करण्याची संधी मिळाल्यास २६/११च्या हल्ल्यातील अनेक मुद्द्यांवर नव्याने प्रकाश पडेल, असे भारतीय तपास अधिकाऱयांना वाटते.

Story img Loader