नेपाळसह संपूर्ण उत्तर भारताला हादरवून टाकणाऱ्या भूकंपानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर पंतप्रधान कार्यालयाचे दिवसभर बारकाईने लक्ष होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, सिक्कीमचे पवनकुमार चामलिंग, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच संवाद साधला. नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला व राष्ट्रपती रामबरन यादव यांच्याकडून मोदींनी स्थानिक परिस्थिती जाणून घेतली. भूकंप झाल्यानंतर अवघ्या तासाभरात पंतप्रधानांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र, एनडीआरएफ व राष्ट्रीय हवामान विभागाचे प्रमुख उपस्थित होते. नेपाळ दौऱ्यावर असलेल्या भारतीय पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्य सरकारने दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनात मदतकेंद्र उभारले आहे. परराष्ट्र मंत्रालयानेदेखील नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. top03एनडीआरएफच्या ४० जवानांचे पथक सायंकाळी उशिरा काठमांडूला रवाना झाले. सुमारे ४० टन खाद्यपदार्थ व औषधे पहिल्या टप्प्यात भारताकडून नेपाळला पाठविण्यात आली आहेत. हिमालय पट्टय़ात झालेल्या या भूकंपामुळे भारतासह शेजारील राष्ट्रेही हादरली आहेत. उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेस प्रारंभ झाल्याने केंद्रात चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकारने उत्तराखंड राज्य सरकारशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केदारनाथ यात्रा सुरक्षितपणे सुरू असल्याचा दावा केला.
विमान उड्डाणे स्थगित
भूकंपामुळे नेपाळच्या मध्यभागात इमारतींचे प्रचंड नुकसान होऊन, विमानतळावरील धावपट्टी बंद झाल्याने भारतातील हवाई वाहतूक सेवांनी नेपाळची राजधानी काठमांडूला जाणारी विमान उड्डाणे स्थगित केली आहेत. सरकारी हवाई वाहतूक सेवा एअर इंडिया, तसेच इंडिगो व स्पाइसजेट या खासगी कंपन्यांनी नेपाळच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत काठमांडूची उड्डाण सेवा स्थगित ठेवली आहे.

भारतीय दूतावासाचे मदतीसाठीचे क्रमांक
+ ९७७ ९८५११ ०७०२१
+ ९७७ ९८५११ ३५१४१

*भूकंपाने नेपाळमधील इमारती ढासळल्या आणि रस्तेही उभे-आडवे उखडले गेले. यामुळे मदतकार्यातही मोठय़ा अडचणी येत होत्या. तसेच एव्हरेस्टच्या ‘बेस कॅम्प’वरील जखमींना प्राथमिक उपचार करण्यासाठी पर्यटकांनी मदतीचा हात दिला होता.

गेल्या तीन दशकांतील विनाशकारी भूकंप
*११ ऑगस्ट २०१२- इराणमधील तबरीझ शहराजवळ प्रत्येकी ६.३ व ६.४ क्षमतेच्या दोन भूकंपांमध्ये ३०६ ठार व ३ हजारांहून अधिक जखमी.
*११ मार्च २०११ – जपानच्या ईशान्य भागात सुनामीमुळे ९.० इतक्या प्रचंड क्षमतेच्या समुद्राखालील भूकंपामुळे १८,९०० लोक ठार. या भूकंपामुळे फुकुशिमा दाइची अणुभट्टीत आणीबाणीची स्थिती उद्भवली होती.
*२३ ऑक्टोबर २०११ – पूर्व तुर्कस्तानमध्ये ७.२ क्षमतेच्या भूकंपामुळे ६०० ठार व किमान ४,१५० जखमी.
*१२ जानेवारी २०१० – हैतीमध्ये ७.० क्षमतेच्या भूकंपाचा धक्का. यात अडीच ते तीन लाख लोकांचा बळी.
*१४ एप्रिल २०१० – वायव्य चीनच्या क्विंघाई प्रांतातील युशू परगण्यात ६.९ क्षमतेच्या भूकंपात ३००० लोक ठार व बेपत्ता.
*१२ मे २००८ – चीनच्या नैर्ऋत्य भागातील सिचुआन प्रांतात झालेल्या ८.० क्षमतेच्या भूकंपात ८७,००० लोक ठार किंवा बेपत्ता.
*२७ मे २००६ – इंडोनेशियाच्या योगकारता भागातील जोरदार भूकंपात ६ हजार लोक ठार व १५ लाख लोक बेघर.
*८ ऑक्टोबर २००५ – ७.६ क्षमतेच्या भूकंपात प्रामुख्याने पाकिस्तानचा वायव्य सीमा भाग आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ७५ हजारांहून अधिक लोक ठार व ३५ लाख लोक विस्थापित.
*२८ मार्च २००५ – सुमात्रानजीकच्या इंडोनेशियाच्या नीस बेटावरील भूकंपात ९०० ठार.
*२६ डिसेंबर २००४ – सुमात्रा बेटाच्या किनाऱ्यानजीकच्या समुद्राखालील प्रचंड भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीत इंडोनेशियातील १,६८,००० लोकांसह हिंदी महासागरालगतच्या देशांमधील २ लाख २० हजार लोक ठार.
*२६ डिसेंबर २००३ – इराणच्या बाम शहरात ६.७ क्षमतेच्या भूकंपात किमान ३१,१८४ लोक ठार व १८ हजार जखमी.
*२६ जानेवारी २००१ – गुजरातमध्ये ७.७ क्षमतेच्या भूकंपात २५ हजार लोक ठार व १,६६,००० जखमी.
*३० सप्टेंबर १९९३ – महाराष्ट्रातील किल्लारीनजीक ६.३ क्षमतेच्या भूकंपात ७,६०१ लोक ठार.
*२० ऑक्टोबर १९९१ – उत्तर प्रदेशातील हिमालयीन पायथ्याशी ६.६ क्षमतेच्या भूकंपात ७६८ लोक ठार.
*२० ऑगस्ट १९८८ – ६.८ क्षमतेच्या भूकंपात पूर्व नेपाळमध्ये ७२१, तर नजीकच्या बिहारमध्ये २७७ ठार.
*२८ ऑगस्ट १९७६ – उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील तांगशान येथे ७.८ क्षमतेच्या भूकंपात २,४२,००० लोक ठार झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे. मात्र काहीजणांच्या मते बळींचा आकडा याहून अधिक.

 

Story img Loader