Israel – Hamas News in Marathi : गाझा पट्टीवरून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टी सील करण्यात आली होती. तसंच, तिथं इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांचीही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा जगण्याची संघर्ष सुरू होता. अखेर, शनिवारी इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने दोन आठवड्यांनंतर खुली केली. त्यामुळे युद्धग्रस्त पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक अशा मदत सामुग्रीची वाहने गाझा पट्टीत दाखल झाली आहेत. आता, भारतानेही गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांना मदत पाठवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत X या समाजमाध्यमावरून माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> इस्रायलचा वेस्ट बँकमधील मशीद परिसरात एअर स्ट्राईक, दहशतवादी तळ उद्ध्वस्त

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची X वर म्हणाले की, पॅलेस्टाईन नागरिकांसाठी ६.५ टन वैद्यकीय साहित्य आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य IAF C-17 या विमानाने रवाना करण्यात आली आहेत. हे विमान इजिप्तच्या El-Arish या विमानतळावर पोहोचेल. औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने, तात्पुरत्या राहण्यासाठी तंबू, ताडपत्री, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू, जलशुद्धीकरण गोळ्यांसह विविध वस्तू पॅलेस्टाईन नागरिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

इस्रायलने केली होती नाकाबंदी

इंधनासह सर्व साहित्यांच्या गाड्यांना सीमेवरच अडवण्यात आल्याने गाझातील नागरिकांची कोंडी झाली होती. तेथील पॅलेस्टाईन नागरिकांचा जीवन-मरणाशी संघर्ष सुरू होता. गाझा पट्टी आणि इजिप्तमधील सीमेवर आधीपासूनच संयुक्त राष्ट्राने पाठवलेल्या सुमारे तीन हजार टन मदतसामुग्रीचे ट्रक उभे होते. शनिवारी ही सीमा खुली झाल्यावर हे ट्रक गाझाच्या दिशेने निघाले. सध्याच्या युद्धग्रस्त गाझातून सुटका करून घेण्यासाठी हजारो नागरिक इजिप्तमध्ये जाण्याच्या प्रतीक्षेत सीमेवर आहेत. मदत सामुग्रीच्या २० वाहनांना प्रथम इजिप्त सीमेवरून इस्रायलने वेढा दिलेल्या गाझा पट्टीत प्रवेश देण्यात आला असून या वाहनांमध्ये जीवरक्षक साहित्याचा समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

मिळत असलेली मदत अपुरी

इजिप्त आणि गाझा पट्टी दरम्यानची सीमा इस्रायलने सुरू केल्यानंतर पॅलेस्टाईन नागरिकांसाठी मदतीचा ओघ वाढू लागला आहे. परंतु, आतापर्यंत मिळालेली मदत अपुरी असल्याचं समोर येतंय.तर दुसरीकडे ही मदत सामुग्री गाझामधील मानवी संकटाच्या तीव्रतेच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे मदत पथकांतील स्वयंसेवकांनी सांगितले. त्यामुळे आता भारतानेही मदत पाठवली आहे.

हेही वाचा >> ‘हमास’ने ओलीस ठेवलेले अमेरिकेचे दोन नागरिक मुक्त

गाझामध्ये २३ लाख पॅलेस्टिनी रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी निम्म्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले आहे. उर्वरित लोक अन्नधान्य पुरवून खात असून अशुद्ध पाणी पीऊन दिवस ढकलत आहेत. तर गाझातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सामग्रीचा आणि जनित्रांसाठी इंधनाचा तुटवडा असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sends humanitarian aid to palestine includes medicines surgical items sgk