मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईद याला भारताच्या स्वाधीन करावे, अशी विनंती भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत बोलत असत असताना दिली. नियमित पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना ते म्हणाले की, भारतातील अनेक प्रकरणांचा तपास करण्यासाठी हाफिज सईदला ताब्यात घेण्याची गरज आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनीही त्याला प्रतिबंधित दहशतवादी घोषित केलेले आहे.
भारतातील काही प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी हाफिज सईदचे भारताकडे प्रत्यार्पण करावे, अशी विनंती संबंधित कागदपत्रांसह पाकिस्तान सरकारला केली आहे, असे बागची पत्रकार परिषदेत म्हणाले.
भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारने फाशीची शिक्षा सुनावली होती. काल (दि. २८ डिसेंबर) ही शिक्षा मागे घेतल्याची बातमी समोर आली होती. या विषयावर भाष्य करताना अरिंदम बागची म्हणाले, कतारच्या विषयामध्ये मी अधिक टिप्पणी करू शकत नाही. कारण अजून आदेशाची कॉपी यायची बाकी आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. आठ भारतीय माजी नौदल अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल.
कॅनडामधील लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर गोळीबार झाला होता. या विषयावर बोलताना बागची म्हणाले की, आमच्या माहितीनुसार ब्रिटिश कोलंबिया मधील हा प्रकार आहे. या प्रकरणातील चौकशी सुरू आहे. आताच या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे थोडे घाईचे ठरेल. आणखी माहिती हातात आल्यानंतर यावर बोलता येईल.