वर्षांकाठी भारतात ७० लाख पर्यटक भेट देतात. हा आकडा वाढून ७ कोटी झाला पाहिजे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. सोबतच भारतात पर्यटन कमी खर्चात झाले पाहिजे. केवळ परदेशी लोकांनाच नव्हे, तर देशांतर्गत पर्यटनाला वाव मिळण्यासाठी पायाभूत सुविधा आणि विमानप्रवास सोयीचा झाला पाहिजे. पर्यटन क्षेत्रात प्रचंड वाव आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने रोजगार उपलब्ध होऊन परदेशी गंगाजळीही भारतात येऊ शकते.
पर्यटन धोरण राबवून ‘मेक इन इंडिया’साठी राज्ये महत्त्वाची भूमिका वठवू शकतात. आज भारतात. ७० लाख पर्यटक येतात. पर्यटनस्थळांना कमी खर्चात भेटी देता येतील, अशी परिस्थिती तयार करायला हवी, अशी माहिती पंडित दीनदयाल उपाध्याय पर्यटन भवनाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी दिली.
नवीन भवनासाठी १२५ कोटींची गुंतवणूक असून दोन वर्षांमध्ये ते पूर्ण केले जाईल. यावेळी उपस्थित केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांना उद्देशून जेटली म्हणाले, सात कोटी पर्यटकांना आकर्षित करू एवढे मोठे ध्येय ठेवण्याबरोबरच तशी तयारीही करायला हवी. त्यासाठी ज्या ठिकाणी पर्यटक सर्वात जास्त भेटी देतात तेथे कार्यालये उघडावीत, असेही त्यांनी सुचवले.
पर्यटन पायाभूत सुविधांविषयी जेटली म्हणाले, केंद्र शासन विमानतळांना अद्ययावत करण्याबरोबरच ‘हायवे’ आणि रेल्वे नेटवर्कमध्ये सुधारणा घडवून आणत आहे. जास्तीत जास्त परदेशी विमाने भारतात आली पाहिजेत जेणे करून पर्यटक भारतात येतील. त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. विमानांची संख्या ५ वरून १० होण्याची गरज आहे. खंडांतर्गत पर्यटन वाढावे म्हणून जहाज आणि समुद्रपर्यटनाकडेही भारताला लक्ष द्यावे लागेल.