इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु असलेल्या संघर्ष आणि युद्धाला पाच दिवस झाले आहेत. यानंतर या प्रकरणात विविध मतं व्यक्त होत आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात या युद्ध आणि संघर्षावरुन विविधं वक्तव्यं केली जात आहेत. अशात काँग्रेस खासदार शशी थरुर यांचं वक्तव्य चर्चेत आहे. भारताने पॅलेस्टाईनलाही पाठिंबा दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. त्यावेळी नेत्यानाहू यांनी फोनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगितलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेत्यानाहू यांना म्हणाले की या कठीण प्रसंगात भारत तुमच्याबरोबर उभा आहे. आम्ही (भारत देश) कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहोत. त्यानंतर NDTV शी संवाद साधत असताना भारताने पॅलेस्टाईनलाही पाठिंबा दिला पाहिजे अशी अपेक्षा शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा- मिया खलिफाची महत्त्वाच्या बिझनेस डीलमधून हकालपट्टी, पॅलेस्टाईनला पाठिंबा देणं पडलं महागात
काय म्हणाले शशी थरुर?
“हमास ही संघटना पॅलेस्टाईनचं प्रतिनिधीत्व करत नाही. पॅलेस्टाईनचे जे मुद्दे आहेत ते भारताने समजून घेतले पाहिजेत आणि त्यांनाही पाठिंबा दिला पाहिजे.” भाजपाने काँग्रेसवर केलेल्या टीकेत हा पक्ष दहशतवादाचं समर्थन करणारा आहे आणि अल्पसंख्यांकाच्या व्होट बँकचं राजकारण करणारा आहे अशी टीका केली होती. त्यानंतर शशी थरुर यांचं वक्तव्य समोर आलं आहे.
हे पण वाचा- “इस्रायलने हवाई हल्ले थांबवले नाहीत तर…”, ओलीस ठेवलेल्या कुटुंबाचा व्हिडीओ दाखवत हमासने दिली ही धमकी
इस्रायल-हमास-पॅलेस्टाईन संघर्षावर काँग्रेसचं म्हणणं काय?
काँग्रेसने सोमवारी पॅलेस्टाईन लोकांच्या जमिनीव होणारा कब्जा, गाजापट्टी या ठिकाणी होणाऱ्या हल्ल्यांवर भाष्य करत त्या भागात सीसफायर केलं पाहिजे असं म्हटलं होतं. तसंच इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात सामान्य माणसं भरडली जात असून त्यांच्या मृत्यूंबाबत संवेदना व्यक्त केली होती. या सगळ्या संघर्षावर तातडीने पर्याय काढला गेला पाहिजे असंही म्हटलं होतं. त्यानंतर आता शशी थरुर यांनी तर पॅलेस्टाईनलाही भारताने पाठिंबा दिला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे.