अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ होण्यामध्ये चीनपाठोपाठ जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्यामुळे सध्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याचे दिसत असले तरी जनतेने घाबरू नये, चालू आर्थिक वर्षांअखेरीस आपण सहा टक्के विकासदर गाठण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे व्यक्त केला.
चीनच्या पाठोपाठ भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, याची जनतेने जाणीव ठेवावी. चीनचा विकासदर १० टक्क्य़ांवरून सात टक्क्य़ांवर आला आहे, मात्र भारताचा विकासदर नऊ टक्क्य़ांवरून पाच टक्क्य़ांवर आला आहे, असेही पी. चिदम्बरम म्हणाले. एका बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जगातील सर्व देशांमध्ये आर्थिक मंदी आहे, जागतिक पातळीवर विकासाचा दर मंदावला होता तरीही त्याचा भारतावर विपरीत परिणाम झाला नाही. आर्थिक मंदीचा फटका युरोपीय देशांनाही बसला आहे. मेक्सिको, ब्राझील यासारखे देश अद्याप भारताच्या मागे आहेत, असेही ते म्हणाले.
भारताचा विकासदर सहा टक्क्य़ांवर जाईल, असा विश्वास व्यक्त करून अर्थमंत्री म्हणाले की, जनतेने आत्मविश्वास बाळगावा आणि शेती, लघुउद्योग, गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे. जनतेने उज्ज्वल भविष्याची अपेक्षा ठेवावी, आर्थिक मंदीची चिंता करू नये, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा