दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या मोहिमेत भारत आमचा अनेक वर्षांपासूनचा सहकारी आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी कोणतीही कृती आमच्याकडून होणार नाही, असा निर्वाळा इस्राएलने दिला आहे. पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची विक्री करण्यात आल्याचे वृत्त धादांत खोटे असल्याबाबत भारताला आश्वस्त करण्यासाठीचा इस्राएलचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
इस्राएलचे भारताशी अनेक वर्षांपासून संबंध आहेत आणि वैश्विक घडामोडींमध्ये भारत हा मुख्य आधारस्तंभ असल्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या देशाकडे पाहतो, असे इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य इस्राएलकडून होणार नाही, असे स्पष्ट करून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची विक्री केल्याच्या वृत्ताचे इस्राएलने जोरदार खंडन केले. त्यापूर्वी इस्राएलच्या परराष्ट्र मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यानेही अशा प्रकारची कोणतीही विक्री करण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.
इस्राएल संरक्षणविषयक सामुग्री पाकिस्तानला निर्यात करणार नाही हे आमचे धोरण असून त्याचा संपूर्णपणे अवलंब करण्यात येत असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. इस्राएल गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तान आणि चार अरब देशांना सुरक्षा उपकरणांची विक्री करीत असल्याचे वृत्त इस्राएलमधील एका दैनिकाने ब्रिटिश सरकारचा हवाला देऊन प्रसिद्ध केले होते.

इतिहास मैत्रीचा..
भारत आणि इस्राएल या दोन राष्ट्रांमध्ये कृषी, संरक्षण सामग्री, सृजनशील कल्पनांची देवाणघेवाण यांसारख्या अनेक बाबींत सहकार्य करार झाले आहेत. रडार, अत्याधुनिक मशीन गन्स, नाईट व्हिजन डिव्हायसेस यांसारख्या सामग्रीचा पुरवठा भारताला इस्राएलकडून होतो. एकेकाळी या राष्ट्राशी संवादात आलेला दुरावा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात कमी झाला. तत्कालीन इस्राएल पंतप्रधान एरियल शेरॉन यांची वाजपेयींनी सदिच्छा भेट घेतली होती.