Pakistan on Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारतासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताच्या शेजारी राष्ट्रांसह अमेरिकेनंदेखील भारतासह ठामपणे उभे असल्याचं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या ७ दहशतवाद्यांपैकी काही पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला परखड शब्दांत सुनावत मोठ्या घोषणा केल्या. त्यात सिंधु जल करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी अशा घोषणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान सरकारला उपरती आली असून उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन केलं जात आहे.
भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून बुधवारी रात्री उशीरा घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारताकडून घेण्यात आलेल्या पाच महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. त्यात सिंधु जल करार रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत मायदेशी परत जावं, पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि पाकिस्तानातील भारतीयांनी लवकरात लवकर भारतात परतणे अशा निर्णयांचा यात समावेश आहे.
भारताच्या निर्णयावर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया
दरम्यान, भारतानं घेतलेल्या या निर्णयांवर पाकिस्तानकडून निषेधाचा सूर आळवण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यात आपला कोणताही हात नसल्याचं सांगत पाकिस्ताननं याआधीच या सर्व प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात आता भारतानं एकतर्फी पद्धतीने सिंधु जल करार रद्द करणं चुकीचं अल्याचा कांगावा पाकिस्ताननं सुरू केला आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतानं सादर करावेत, अशीही मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.
पाकिस्तानला उपरती, बैठकांना वेग
दरम्यान, भारतानं घेतलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तान सरकारला जाग आली असून आता या सर्व प्रकरणावर भारताने मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून तयारी केली जात आहे. पाकिस्तानमध्ये काही उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन गुरुवारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. “पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात आली असून पंतप्रधान शाहबाझ शरीफ या बैठकीचे अध्यक्ष असतील”, अशी माहिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पीटीआयशी बोलताना दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद केलं आहे.
“भारतानं उचललेल्या पावलांना योग्य उत्तर देण्यासाठी या समितीच्या बैठकीत निर्णय घेतले जातील. या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. जेव्हा कधी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा अशा बैठकीचं आयोजन केलं जातं”, असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.