भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या तटावर अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) ही चाचणी करण्यात आली आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ही चौथी आणि शेवटची चाचणी होती. यावेळी पूर्ण क्षमतेने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. संपूर्ण चीन अग्नी-५ च्या कक्षेत असणार आहे. अग्नी-५ अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहे.
ओडिशाच्या व्हिलर बेटावरुन अग्नी-५ ची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीन येत असल्यामुळे व्यूहनितीच्या दृष्टीने ही चाचणी अतिशय महत्त्वाची होती. अग्नी-५ ची शेवटची चाचणी जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली होती. चीनपर्यंत मारा करण्याची अग्नी-५ ची क्षमता आहे. संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्नी-५ चे ३ टप्पे आहेत. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडला सुपूर्द करण्याआधीची अग्नी-५ ची ही शेवटची चाचणी होती. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडची (एसएफसी) स्थापना २००३ मध्ये करण्यात आली आहे. देशाच्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे काम स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे आहे.
अण्वस्त्र डागण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ ला अगदी सहजपणे कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते. अग्नी-५ च्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून शत्रूवर अण्वस्त्र सोडले जाऊ शकते. यााधी २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये अग्नी-५ ची चाचणी घेण्यात आली आहे. सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडे ५ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. आता या देशांच्या पंगतीत भारताचा समावेश झाला आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत जगातील सहावा देश आहे.