नवी दिल्ली :हल्ला करणारे क्षेपणास्त्र हवेत नष्ट करण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या ‘एडी-१’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. विशेष म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेली क्षेपणास्त्रे टिपण्याचीही याची क्षमता आहे. या यशामुळे संरक्षण क्षेत्रात भारताने नवी भरारी घेतली असून, काही मोजक्या देशांच्या यादीत स्थान पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) ओदिशापासून जवळ समुद्रात असलेल्या ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून ‘फेज-२ बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स (बीएमडी) इंटरसेप्टर’ (एडी-१) क्षेपणास्त्राची पहिली प्रत्यक्ष चाचणी बुधवारी घेण्यात आली. यावेळी सर्व यंत्रणांनी अपेक्षेप्रमाणे कार्य केले. या प्रक्षेपणाबाबत विविध संवेदकांच्या माध्यमातून जमवण्यात आलेल्या माहितीची योग्य पडताळणी करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘डीआरडीओ’च्या चमूसह या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वाचे अभिनंदन केले. या चाचणीमुळे अत्यंत कमी देशांकडे असलेली क्षमता भारताकडे उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले. यामुळे देशाची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षणातील क्षमता वाढली असल्याचेही सिंह यांनी नमूद केले. तर या क्षेपणास्त्रामुळे त्याच्या वापरकर्त्यांना वेगवेगळय़ा प्रकारच्या लक्ष्यांचा वेध घेणे आता शक्य होणार असल्याचे ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष समीर कामत यांनी सांगितले.

क्षमतेत वाढ..

एडी-१ हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, द्विस्तरीय ‘सॉलिड मोटर’ आणि देशांतर्गत विकसित झालेल्या नियंत्रण, वहन आणि मार्गदर्शन प्रणालींनी युक्त आहे. ‘लो एक्झो-अ‍ॅटमॉस्फिअरिक’ (वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या भागात) आणि ‘एण्डो-अ‍ॅटमॉस्फिअरिक’ (पृथ्वीपासून १०० किलोमीटर अंतरावर) असलेले लक्ष्य टिपण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. क्षेपणास्त्र किंवा विमान अशा दोन्ही लक्ष्यांचा हवेत वेध घेण्याची त्याची क्षमता आहे.

प्रकल्प काय?

पाकिस्तान आणि चीनच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर लक्ष ठेवून ‘डीआरडीओ’ने अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रकल्प २००० सालाच्या सुमारास हाती घेतला. २०१०च्या अखेरीस याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पृथ्वी क्षेपणास्त्राच्या धर्तीवर अद्ययावत हवाई सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आली. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेप्रमाणे अधिक उंचीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यापेक्षाही अधिक उंचीवर लक्षवेध करण्याची क्षमता असलेले एडी-२ हे क्षेपणास्त्रही विकसित होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

एडी-१ची चाचणी यशस्वी करणाऱ्या ‘डीआरडीओ’ आणि चमूचे अभिनंदन. अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे अत्यंत कमी देशांकडे उपलब्ध आहे. यामुळे देशाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षणक्षमता अधिक वाढली आहे.

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India successfully tests long range interceptor missile zws
Show comments