Pakistani Diplomats In India: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री दिल्लीतील पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक पर्सोना नॉन ग्राटा नोट (भारत सोडण्यासाठी औपचारिक पत्र) सोपवली आहे. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर भारताने ही कारवाई केली आहे. याबाबत एनआयए या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. या बैठकीनंतर, दहशतवाद्यांना सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने कठोर निर्णय घेतले आहेत.
सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले होते की, “नवी दिल्लीत असलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सोना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत आहे. भारतही इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागार माघारी बोलावणार आहे.”
विक्रम मिस्री यांनी पुढे सांगितले की, “संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात. तसेच पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.”
मंगळवारी दुपारी, पहलगामपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या बैसरन परिसरात पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. यामध्ये भारतातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ला हा अलिकडच्या काळात काश्मीर खोऱ्यातील सर्वात घातकी हल्ल्यांपैकी एक होता.