Surgical strike 2: भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत केलेल्या हल्ल्यात सुमारे ३२५ दहशतवादी ठार झाल्याचे समजते. भारताच्या हल्ल्यात जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रुम उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त असून मृतांमध्ये मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर याचा देखील समावेश असल्याचे समजते.
मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. भारताच्या मिराज विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हे एअर स्ट्राइक केले आहे. या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे समजते.
भारतीय हवाई दलाने मिराज २००० विमानांनी हे एअर स्ट्राइक केले असून १२ विमाने पाकिस्तानच्या हद्दीत गेली होती. सुमारे २१ मिनिटे भारताच्या विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ३२५ दहशतवादी मारले गेल्याचे समजते. भारताच्या सर्जिकल स्ट्राइक २ मुळे पाकमधील दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायचा, अशी माहिती समोर आली आहे. या कारवाईत त्याचा देखील खात्मा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात ३२५ दहशतवाद्यांसह २५ ट्रेनरचाही खात्मा झाल्याचे सांगितले जाते.
तर पाकिस्तानी सैन्याने भारतीय विमानांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. मात्र, यात पाकिस्तानच्या हद्दीत कोणतेही नुकसान झालेले नाही.पाकने भारताच्या विमानांना चोख प्रत्युत्तर दिले, असे पाकने म्हटले आहे.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी भारताने हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.