पीटीआय, वॉशिंग्टन / फ्लोरिडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परस्परसमान करपद्धतीचा (रेसिप्रोकल टेरिफ) निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडला नसला, तरी यातून भारताला कोणतीही सवलत मिळणार नाही, असे त्यांना निक्षून सांगितल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भारताला दिली जाणारी मदत थांबविण्याचेही त्यांनी एका मुलाखतीत जोरदार समर्थन केले.

अमेरिकेतील ‘फॉक्स न्यूज’ वाहिनीला ट्रम्प आणि त्यांचे सहकारी तसेच अब्जाधीश इलॉन मस्क यांनी मुलाखत दिली. पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचण्यास काही तास बाकी असताना ट्रम्प यांनी परस्परसमान करपद्धतीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. याबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, की अन्य देश अमेरिकेच्या वस्तूंवर जितका कर लावतील, तितकाच कर त्या देशावर लावला जाईल. पंतप्रधान मोदी यांना या निर्णयाबाबत स्पष्ट सांगितले. त्यावर ‘नको, नको. मला हा निर्णय आवडलेला नाही,’ असे वक्तव्य मोदींनी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र ‘तुम्ही जितका कर लावाल, तितकाच आम्ही लावू. मी प्रत्येक देशाबरोबर हेच करीन,’ असे अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितले. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या पहिल्या काळात भारताला ‘करांचा राजा’ असे संबोधले होते व मे २०१९ मध्ये बाजारपेठेतील प्राधान्याने प्रवेशाचा भारताचा दर्जाही काढून घेतला होता.

‘भारताकडे पुष्कळ पैसा…’

‘मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी भारताला २.१ कोटी डॉलर देण्यामागील हेतू काय,’ असा प्रश्न ट्रम्प यांनी या मुलाखतीत विचारला. त्यांच्याकडे पुष्कळ पैसा आहे. आम्ही २.१ कोटी डॉलर का देत आहोत? भारताला देण्यात येणारा हा निधी रद्द करण्याचा प्रशासन कार्यक्षमता विभागाने (डीओजीई) घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे ट्रम्प म्हणाले. याबरोबरच बांगलादेश, नेपाळ यांना दिला जाणारा निधीही थांबविल्याचे ते म्हणाले.

माझ्याशी कुणीही वाद घालू शकत नाही. भारताकडून अमेरिकेच्या वस्तूंवर जगात सर्वांत जास्त कर आकारणी होते. कराच्या बाबतीत तो देश अतिशय कडक आहे. मी त्यांना दोष देत नाही. पण व्यापार करण्याची ही वेगळीच पद्धत आहे. भारताला कुठलीही वस्तू विकणे कठीण जाते. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

सुनीता अवकाशात अडकण्यामागे राजकारण – मस्क

‘नासा’चे दोन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कित्येक महिन्यांपासून अडकलेले आहेत. त्यात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाने राजकीय कारणांसाठी त्यांना तेथेच ठेवले आहे, असा आरोप मस्क यांनी मुलाखतीत केला. मस्क हेच ‘स्पेस एक्स’चे संस्थापक आहेत. विल्यम्स आणि बुच विल्मर यांना महिनाभरात परत आणण्याचे प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.