मुंबई हल्ल्याचा कट उलगडण्यासाठी लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी डेव्हीड हेडली याला एक वर्ष भारताच्या ताब्यात द्यावे तसेच त्याचा साथीदार तहव्वुर हुसेन राणा याचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी-अमेरिकी असलेला हेडली याला तात्पुरते भारताच्या ताब्यात देण्यात यावे यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही विनंती करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन येथे भारत-अमेरिका अंतर्गत सुरक्षा संवाद शिखर बैठकीत ही विनंती करण्यात आली असून त्यावर विचार करण्यात येईल, असे आश्वासन अमेरिकी संवादकांनी दिले आहे, असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हेडलीचा साथीदार राणा याला भारताच्या ताब्यात देण्याचाही सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. हेडलीला २६/११ च्या हल्ल्यासाठी रेकी करण्यात मदत करण्यात राणा याने मदत केली होती. हेडलीकडून माहिती घेण्याची भारताला दुसऱ्यांदा संधी मिळावी, असे भारताने सूचित केले होते. राणा याचे जाबजबाब घेण्याची संधी मात्र भारताला अजून मिळालेली नाही, त्याला अमेरिकी न्यायालयाने डेन्मार्क येथील दहशतवादी हल्ला कटात दोषी ठरवले होते. राणा हा हेडलीचा साथीदार असून त्याच्या जाबजबाबात महत्त्वाची माहिती हाती येऊ शकते, असे भारताला वाटते. हेडली व राणा यांनी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात मोठी भूमिका पार पाडली होती. हेडली याच्यावर दहशतवादाचे बारा आरोप असून त्यात नोव्हेंबर २००८ मधील हल्ल्यात सामील असल्याच्या आरोपाचाही समावेश आहे. त्या हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले होते. त्याने आरोप मान्य केले आहेत.

Story img Loader