भारताच्या अग्नी-१ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची उपयोजित चाचणी सोमवारी यशस्वीरित्या पार पडली. चलत प्रक्षेपकाच्या मदतीने ओडिशातील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या संकुल चार येथून सकाळी ९.१५ वाजता या क्षेपणास्त्राचे उड्डाण करण्यात आले. जमिनीवरून मारा करण्यात येणारे हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. या क्षेपणास्त्रात केवळ ९ मिनिट ३६ सेकंद इतक्या वेळेत हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता आहे. लक्ष्य शोधण्यासाठी या क्षेपणास्त्रात प्रगत दिशादर्शन प्रणालीचा वापर केलेला आहे. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून क्षेपणास्त्राच्या साठय़ातून कुठलेही क्षेपणास्त्र निवडून त्याची चाचणी केली जाते. यापूर्वी २७ नोव्हेंबर २०१५ रोजी अग्नी-१ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.
‘अग्नि’नामा
नाव – अग्नी १
वजन – १२ टन
लांबी – १५ मीटर
क्षमता – १००० किलो वजन वाहून नेण्याची
विकासक – डीआरडीओ