अमेरिकेच्या न्यायालयाने २६/११च्या घटनेमागील एक सूत्रधार असणाऱ्या दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याला सुनावलेल्या ३५ वर्षांच्या शिक्षेने भारताचे समाधान झाले नसून त्याला मृत्युदंडाचीच शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भारताने केली आहे. तसेच हेडली याचे भारताकडे प्रत्यार्पण करावे, अशी मागणीही भारताने केली आहे.
अमेरिकेतील कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींमुळे गंभीर गुन्हा घडूनही मृत्युदंडाच्या शिक्षेतून सुटका झालेला लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडली याचे भारताकडे प्रत्यार्पण व्हावे तसेच त्याच्यावर भारतामध्ये खटला चालावा या मागणीवर ठाम असल्याचा पुनरुच्चार भारताने केला. केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शिद यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. तसेच, केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी भारताने हेडलीच्या प्रत्यार्पणाची मागणी अमेरिकेकडे लावून धरली असल्याचे स्पष्ट केले.
२६/११च्या घटनेमागील सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर जर भारतामध्ये खटला चालला असता, तर त्याला फाशीचीच शिक्षा झाली असती, असा दावा भारताचे पररारष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शिद यांनी केला. तर केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी हेडलीसह २६/११शी संबंधित प्रत्येक गुन्हेगारालाच फाशी व्हावयास हवी, अशी भारताची मागणी असल्याचे सांगितले.
शिकागो न्यायालयाने फर्मावलेली शिक्षा ऐकून आपले समाधान झाले नसले तरीही अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून हेडली याला झालेली शिक्षा ही फक्त एक सुरुवात आहे, असे खुर्शिद यांनी नमूद केले.
अमेरिकेमधील न्यायपद्धतीची आणि अंमलबजावणी यंत्रणेची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, मात्र तरीही डेव्हिड हेडली याला देहदंडाची शिक्षाच व्हावयास हवी ही आपली मागणी कायम असल्याचे खुर्शिद यांनी सांगितले.  

Story img Loader