वॉशिंग्टन/नवी दिल्ली : आपले भारताबरोबरचे संबंध अत्यंत चांगले आहेत. मात्र जगातील सर्वाधिक कर लावणारा तो देश आहे, ही एकमेव समस्या आहे. त्यामुळे २ एप्रिलपासून भारतीय मालावर जशास तसा कर लावण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. याचा फटका प्रामुख्याने कृषी उत्पादने आणि औषधांच्या निर्यातीला बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील वृत्तसंकेतस्थळ ‘ब्रेइटबार्ट न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवर जेवढ्यास तेवढे शुल्क लावले जाईल, याचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या शिखर परिषदेबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, की ते (भारत) अमेरिकेतून आयात मालावरील कर लक्षणीयरित्या कमी करतील अशी अपेक्षा आहे. मात्र असे न झाल्यास २ एप्रिलपासून ते जेवढा कर लावतात तेवढाच कर लावला जाईल. अमेरिकेबरोबर असलेल्या द्विपक्षीय व्यापार करारातील मुद्द्यांबाबत सर्व संबंधितांशी चर्चा सुरू असून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तोडगा काढला जाईल, असे भारताच्या वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याच आठवड्याच्या सुरुवातीला स्पष्ट केले होते. अॅल्युमिनियम आणि लोखंडावर २५ टक्के आयात शुल्काचा आधीच या क्षेत्रांना फटका बसत असताना निर्यातीत भारताची मक्तेदारी असलेली कृषी उत्पादन आणि औषध क्षेत्रेदेखील अमेरिकन कराच्या वरवंट्याखाली येण्याची भीती आहे.

अमेरिकेतील शिक्षण खाते बंद करण्याची तयारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शिक्षण विभाग बंद करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ट्रम्प यांनी शिक्षण खाते निरुपयोगी आणि भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader