भारतातील मोसमी पावसावर अल निनोचा परिणाम होत असल्याचे अभ्यासातून समोर येत आहे. मात्र याचा देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नसून या वर्षी मोसमी पावसाच्या हालचालींवर आधीपासूनच लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बुधवारी सांगितले.
 येथे आयोजित केलेल्या खरीप २०१४ संमेलनांनंतर पत्रकारांशी पवार बोलत होते. याबाबत आताच भाकीत करणे योग्य होणार नाही. मात्र मंगळवारी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता. आगामी मोसमी पावसाचा अंदाज एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ातच वर्तवणे शक्य होणार असल्याचे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मोसमी पावसावर अल निनोचा परिणाम होत आहे. २००९ पासून अशा प्रकारची परिस्थिती देशात जाणवू लागली आहे. याबाबत हवामान खात्याचे तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते अल निनोमुळे एकूण कृषी उत्पादनावर म्हणाला तसा परिणाम होणार नाही. मात्र असे असले तरी हवामानातील बदलावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे पवार यांनी सांगितले.
मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे आणि पश्चिमेकडील थंडी यामुळे अल निनोचा प्रभाव जाणवतो. प्रत्येक चार ते १२ वर्षांत अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. २००९ मध्ये भारतीय पावसाळ्याला त्याचा फटका बसला होता. त्यानंतर मोठय़ा दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
भारतीय कृषिक्षेत्र मोठय़ा प्रमाणात लहरी पावसावर अवलंबून आले. पावसाची अनिश्चितता ही देशासमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही उपयुक्त ठरतील, अशी बियाणी विकसित करण्याबाबत शेतीतज्ज्ञांना सांगण्यात आल्याचे पवारांनी सांगितले.

Story img Loader