देशात अनेक ठिकाणी महामार्गांच्या अवस्थेच्या बाबतीत जनता कायमच नाराज असल्याचं चित्र असतं. मात्र, येत्या तीनच वर्षांमध्ये हे चित्र बदलणार असल्याचा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पुढील तीन वर्षांत देशातले सर्व राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेतल्या महामार्गांसारख्या दर्जाचे असतील, असं ते म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कार्यकालाला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने चांगलाच वेग घेतला आहे. माझा विश्वास आहे की येत्या तीन वर्षात संपूर्ण देशातले महामार्ग हे अमेरिकेच्या महामार्गांच्या दर्जाचे असतील. एकेकाळी आपण एका दिवसात फक्त २ किलोमीटरचा रस्ता बांधत होतो. मात्र आता आपण एका दिवसात ३८ किलोमीटरचा रस्ता बांधतो.

गडकरी यांनी हेही सांगितलं की, दृतगती मार्ग बांधण्यासंदर्भातले तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स करण्यात गुजरातचा वाटा आहे. यावेळी त्यांनी वडोदरा-मुंबई दृतगती मार्ग तसंच सोलापूर विजापूर दृतगती मार्गाचंही उदाहरण दिलं.

त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की, सध्या किम आणि वडोदरा यांच्यादरम्यान अंकलेश्वरवरवरून जाणाऱ्या १२५ किलोमीटरच्या दृतगती मार्गाचं ८,७११ कोटींचं काम सुरु आहे. या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत हे काम संपेल. हा दिल्ली- मुंबई दृतगती मार्गाचाच भाग असेल. हा मार्ग गुजरातच्या दाहोड, पंचमहाल्स, वडोदरा, भरुच, सुरत, वलसद आणि दादरा व नगर हवेली या जिल्ह्यांमधून जाईल.

Story img Loader