नवी दिल्ली : ‘केंद्र सरकारने देशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली असून, नौदलासाठी २६ राफेल विमानांच्या खरेदीचा आणि तीन स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे,’ अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सोमवारी दिली.
४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अॅडमिरल त्रिपाठी यांनी सांगितले, की सरकारने अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुडी निर्मितीसाठी (एसएसएन) मंजुरी दिली आहे. ‘एसएसएन’मुळे नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होईल. अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी २०३६-३७ पर्यंत, तर दुसरी पाणबुडी त्यापुढील दोन वर्षांत तयार होईल. ‘नौदलासाठी असणारी राफेल लढाऊ विमानांची आवृत्ती ‘राफेल मरिन’ खरेदीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा >>> गिनियात चेंगराचेंगरीत ५६ ठार; फुटबॉल सामन्यादरम्यान दुर्घटनेत अनेक लहानग्यांचा मृत्यू
पाकिस्तानी नौदलाबद्दल आश्चर्य
आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही पाकिस्तानी नौदलाच्या वाढत्या हालचालींबद्दल नौदलप्रमुखांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की ‘पुढील दशकापर्यंत पाकिस्तानी नौदलाचे ५० युद्धनौकांचे नौदल बनण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांची आर्थिक स्थिती पाहता एवढ्या नौका आणि पाणबुड्या ते कशा उभारतात, हे आश्चर्यच आहे. जनकल्याणाऐवजी त्यांनी शस्त्राला प्राधान्य दिल्याचे उघड आहे. पाकिस्तानच्या अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या चीनच्या सहकार्याने तयार केल्या जातात.’
नौदलप्रमुखांच्या वक्तव्यांतील ठळक मुद्दे
● भारताच्या विविध जहाजबांधणी कारखान्यांत ६२ युद्धनौका आणि एका पाणबुडीची बांधणी सुरू
● देशी बनावटीच्या ३१ नौका आणि पाणबुडी बांधणी प्रकल्पाचे सुरुवातीचे प्रस्ताव मान्य ● नौदलासाठी ६० युटिलिटी हेलिकॉप्टरच्या खरेदीस सरकारची मान्यता