झाकिर हुसैन ट्रस्टमधील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून आपण केंद्रीय विधी व न्यायमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, मात्र ‘ऑपरेशन धृतराष्ट्र’द्वारे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या ‘इंडिया टुडे’ समूहाचे सर्वेसर्वा अरुण पुरी यांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्यासोबत या प्रकरणी चौकशीला सामोरे जावे, असे आव्हान सलमान खुर्शीद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. खुर्शीद यांचा ७१ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा दावा ‘इंडिया टुडे’ने केला असून त्यांच्या विरोधात खुर्शीद यांनी १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला भरला आहे.
रविवारी सकाळी इंग्लंडहून परतलेल्या खुर्शीद यांनी दुपारी पत्रकार परिषद बोलावून झाकिर हुसैन ट्रस्टच्या वतीने अपंगांसाठी आयोजित शिबिरांची छायाचित्रे व दस्तावेज दाखवून त्यांच्यावर ‘इंडिया टुडे’च्या आजतक, हेडलाइन्स टुडे या वाहिन्या तसेच इंडिया टुडे आणि मेल टुडे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. टीव्ही टुडेवर आपणही रिव्हर्स स्टिंग केले आहे, असा दावाही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेत ‘इंडिया टुडे’च्या प्रतिनिधींशी खुर्शीद यांचे वारंवार खटके उडाले. केंद्रीय समाज कल्याण आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून आम्हाला ७१ लाख रुपये मिळाले, पण आम्ही ७७ लाख खर्च केले. अपंगांसाठी तब्बल ३४ शिबिरांचे आयोजन केले, असा दावा छायाचित्रे दाखवत खुर्शीद यांनी केला. केंद्राकडून अनुदान मिळविताना सादर केलेल्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या बनावट असतील तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे खुर्शीद आणि त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांनी स्पष्ट केले.
आपल्या बचावाखातर त्यांनी लेखा परीक्षणाचा अहवाल आणि पावत्याही दाखवल्या तसेच लाभार्थी अपंगांनाही पत्रकारांपुढे सादर केले. या पत्रकार परिषदेदरम्यान खुर्शीद यांनी केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांचीही उत्तरे दिली.

Story img Loader