पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला दहशतवाद्यांच्या काळा यादीत टाकण्याचा अमेरिका आणि भारताचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत रोखला आहे. साजिद मीर हा २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आहे. गेल्या चार महिन्यात तिसऱ्यांदा चीनने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करुन काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार मीरची मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रात्र बंदी सारखे निर्बंध लावण्यात येणार होते. मीर हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून त्याच्यावर अमेरिकेने ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस ठेवले आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी विरोधी न्यायालयाने जून महिन्यात दहशतवाद्यांना वित्त पुरवठा केल्याप्रकरणी मीरला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. पॅरिसमधील ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’च्या(FATF) ग्रे यादीमधून बाहेर पडण्यासाठी दहशतवादी मीरची धडपड सुरू आहे. दरम्यान, मीरचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वारंवार केला आहे. मात्र, हा दावा फेटाळून लावत युरोपीयन राष्ट्रांनी पाकिस्तानला याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेत साजिद मीर हा दहशतवादी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता, असे अमेरिकेकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ अब्दुल रौफ अझहर याला संयुक्त राष्ट्राच्या काळ्या यादीत टाकण्याच्या अमेरिका आणि भारताच्या प्रस्तावालाही गेल्या महिन्यात चीनने विरोध दर्शवला होता.