आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची ग्वाही

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत, घनिष्ठ आणि दृढ होतील, यात शंका नाही, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय बैठकीदरम्यान दिली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाइट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. यावेळी, ४० लाख भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अमेरिकेला अधिक मजबूत बनवत आहेत, असे बायडेन यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना नमूद केले. मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत करण्याचे बीज रोवले गेले आहे. दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या या पहिल्या द्विपक्षीय बैठकीत हवामान बदल, आर्थिक सहकार्य, करोना विषाणू साथ यांसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.  

आपल्यातील द्विपक्षीय बैठक महत्त्वाची आहे. या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या प्रारंभी आपण भेटत आहोत. या दशकाला आकार देण्यात आपले नेतृत्व निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, अशा शब्दांत मोदी यांनी बायडेन यांचे कौतुक केले. अमेरिकेच्या प्रगतीत भारतीय वंशाचे नागरिक सक्रीय सहयोग देत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. मोदी यांची २०१४ पासूनची ही सातवी अमेरिका भेट आहे. बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतरची प्रथमच मोदी यांनी त्यांची भेट घेतली.

तंत्रज्ञान ही एक प्रेरक शक्ती बनत असल्याचे नमूद करीत मोदी म्हणाले, की जागतिक स्तरावर काही चांगले घडवण्यासाठी आपल्याला आपल्या प्रतिभेचा वापर करून तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा लागेल. आगामी दशकात भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये व्यापार हा एक महत्त्वाचा घटक असेल हे लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की या क्षेत्रात बरेच काही करायचे आहे.

बायडेन म्हणाले, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या या देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत, जवळचे आणि घनिष्ट होणे निश्चित आहे. पंतप्रधान मोदी ‘क्वाड’ परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचीही भेट घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India us relations stronger us president joe biden akp