India US Relations Condoleezza Rice at Indus X Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन महिन्यांमध्ये युक्रेन व रशिया दौरा पूर्ण करून मायदेशी परतले आहेत. मात्र मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर भारत व अमेरिकेचे संबंध बिघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलीजा राइस यांनी उभय देशांमधील संबंधांबाबत उडालेल्या सर्व अफवांचं खंडण केलं आहे. त्या म्हणाल्या, “वॉशिंग्टन दर पाच मिनिटांनी नवी दिल्लीच्या निष्ठेची परीक्षा घेऊ शकत नाही. भारत व अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध खूप दृढ आहेत. व्हाइट हाउसला या नात्याचं महत्त्व चांगलंच माहित आहे. भारताने म्हटल्याप्रमाणे दोन्ही देशांना धोरणात्मक स्वायत्तता हवी आहे आणि मला किंवा आपल्या देशाला त्यात काहीच अडचण वाटत नाही”. राइज या इंडस-एक्स शिखर परिषदेत बोलत होत्या.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संचालिका असलेल्या राइज यांनी लष्करी उपकरणांना भंगार ठरवलं आहे. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांच्या मॉस्को दौऱ्याचा संरक्षणाच्या दृष्टीने काही खास फायदा होणार नाही. अमेरिकेने भारताबरोबर लष्करी सहकार्य वाढवण्यात मंद गतीने पावलं टाकली आहेत आणि याची वॉशिंग्टनला जाणीव आहे. यात आपण महत्त्वचा वेळ व संधी गमावल्या आहेत, याची वॉशिंग्टनला कल्पना आहे. दुसऱ्या बाजूला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातली मैत्री नरेंद्र मोदींना माहीत आहे. ही मैत्री भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकते.

हे ही वाचा >> Divorce Perfume : दुबईच्या राजकुमारीने DIVORCE नावाचा परफ्युम केलं लॉन्च; सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

अमेरिकेला चीनची भिती?

राइज यांच्या मते चीन हा अमेरिकेसाठी मजबूत प्रतिस्पर्धी आहे. दोन्ही देशांमधील तणाव हा शीतयुद्धापेक्षा गंभीर आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेसमोर रशियाचं आव्हान होतं. मात्र तेव्हा मॉस्कोकडे मोठी लष्करी ताकद असली तरी ते तांत्रिक व आर्थिक स्तरावर खूप मागे होते. मात्र चीनची परिस्थिती तशी नाही. चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे आहे. त्यांनी आजवर नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आहे. नेटवर्क व पुरवठा साखळीच्या बाबतीत चीन इतका पुढे गेला आहे की त्यांचा सामना करणं अवघड आहे.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “शिखांना पगडी व कडं परिधान करण्याची…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपाचा संताप; म्हणाले, “काँग्रेसने कत्तली घडवून…”

मोदी यांनी अलीकडेच रशिया व युक्रेनचा दौरा केला होता. जुलै महिन्यात ते मॉस्कोला गेले तेव्हा त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ते कीव दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती.

Story img Loader