Donald Trump PM Modi Friendship: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्डा ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आयात आणि निर्यात शुल्कांबाबात कठोर भूमिका घेतली आहे. इतर देश अमेरिकेला जितका आयात कर आकारतात तितकाच कर अमेरिका त्यांच्यावर लादणारा असल्याचे म्हटले आहे. अशात ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चेचे सकारात्मक परिणाम येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याचबरोबर ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र असल्याचा उल्लेख करत ते खूप हुशार व्यक्ती असल्याचेही म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी चांगले मित्र
“पंतप्रधान मोदींनी नुकतेच अमेरिकेला भेट दिली. यावेळी आमच्यात खूप चांगल्या चर्चा झाल्या. आमचे कायमच मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. ते माझे चांगले मित्र आणि खूप हुशार व्यक्ती आहेत. तुमचे पंतप्रधान उत्तम आहेत. पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणारा देश आहे”, असे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिका त्यांच्या वस्तूंवर इतर देश जितका कर आकारतात तितकाच कर इतर देशांच्या वस्तूंवर आकारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अमेरिकेचे अनेक देशांबरोबर संबंध ताणले केले आहेत. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले मोदींचे कौतुक लक्षवेधी ठरत आहे.
भारत “टॅरिफ किंग”
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर टीका केली होती. त्यांनी भारताला “टॅरिफ किंग” आणि त्याच्या आयात कर “खूप अन्याय्य आणि अति” असल्याचे म्हटले होते. ते असेही म्हणाले होते की, “भारताशी माझे खूप चांगले संबंध आहेत, परंतु भारताबाबत माझी एकमेव समस्या आहे ती म्हणजे ते जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मला वाटते की कदाचित ते कर कमी करतील, परंतु २ एप्रिल रोजी, आम्ही त्यांच्यावर तितकाच कर आकारू जितका ते आमच्याकडून आकारतात.”
जशाच तसे उत्तर देण्याची भूमिका
तत्पूर्वी ५ मार्च रोजी अमेरिकेच्या संयुक्त अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातशुल्क वाढीला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, “भारत आमच्याकडून अधिक आयातशुल्क वसूल करत आहे, त्यामुळे आम्हीही आयात शुल्क वाढवू.”
याचबरोबर काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी, “भारताने अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवरील कर कमी केले जातील असे आश्वासन दिले आहे”, असा दावा केला होता. त्यावेळी त्यांचा हा दावा भारताने फेटाळून लावला होता.