पीटीआय, वॉशिंग्टन
‘भारत-अमेरिकेमधील व्यापार २०३०पर्यंत दुपटीहून अधिक म्हणजेच ५०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, या संदर्भात द्विस्तरावरील कराराची बोलणी सुरू झाली आहेत. आयातशुल्क कमी करणे आणि परस्पर बाजारपेठांचा प्रवेश यातून मिळणार आहे,’ अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त पत्रकात देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पत्रकानुसार, दोन्ही नेत्यांनी द्विस्तरावरील व्यापारी संबंध वाढविण्याची कटिबद्धता दर्शविली. योग्य व्यापारी पद्धत राष्ट्रीय सुरक्षेची काळजी, रोजगारनिर्मितीची हमी त्यातून देण्यात येईल. दोन्ही नेत्यांनी ‘मिशन ५००’ हे उद्दिष्ट त्यासाठी ठेवले आहे.

दोन्ही देशांतील व्यापार २०३०पर्यंत ५०० अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक नेण्यात येणार आहे. असे होण्यासाठी नव्या व्यापारी नियमांची आवश्यकता असून, त्यासाठी २०२५ अखेरीपर्यंत द्विस्तरावर करार करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. या चर्चेसाठी दोन्ही देश वरिष्ठ प्रतिनिधी नियुक्त करतील. लष्करी, वाणिज्य, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रांत व्यापारवृद्धी केली जाईल. वस्तू आणि सेवा क्षेत्रात एकत्रित दृष्टिकोन भारत आणि अमेरिकी त्यासाठी ठेवेल. बाजारपेठीय प्रवेश, आयातशुल्कात कपात आणि करमुक्त अडथळे, साखळी पुरवठा यंत्रणा यामध्येही उभय देशात एकत्रित काम होईल.

ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात भारताबरोबर छोटा व्यापारी करार करण्यावर चर्चा झाली होती. पण, बायडेन प्रशासनाने मुक्त व्यापारी करारावरील ही चर्चा गुंडाळून टाकली. भारताने बोरबॉन, मोटरसायकल, माहिती-तंत्रज्ञानमधील उत्पादनांवरील आयातशुल्क कमी केल्याचे अमेरिकेने स्वागत केले आहे. तसेच, भारतातील आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीवर उपाययोजना करण्यासाठी अमेरिकेने उचललेल्या पावलांचे भारताने स्वागत केले आहे. कृषी क्षेत्रातील व्यापारवाढीवरही दोन्ही देश येत्या काळात काम करतील.

भारत आणि अमेरिका १० वर्षांसाठी संरक्षण भागीदारी करणार आहे. अमेरिकेकडून येत्या काळात भारताला शस्त्रांची अधिक विक्री होणार असून, अत्याधुनिक ‘एफ-३५’ विमानही भारताला देण्यात येणार आहे.

जगभरातील माध्यमांकडून ट्रम्प-मोदी भेटीची दखल; भेटीतील विविध मुद्द्यांना महत्त्व

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली. प्रत्येक माध्यमांनी भेटीतील एखाद्या पैलूला महत्त्व दिल्याचे दिसले.

● ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने भारत-अमेरिकेतील व्यापारी कराराच्या वृत्ताला महत्त्व दिले आहे. दोन्ही देशांतील व्यापार २०३०पर्यंत ५०० अब्ज डॉलरचा होण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी ठेवले आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ने ट्रम्प यांनी भारताने अमेरिकेवर लादलेल्या आयातशुल्कावर टीका केली आहे. तसेच, भारताच्या वस्तूंवरही भारत अमेरिकेच्या वस्तूंना लावतो, तितकेच कर लावेल, या ट्रम्प यांच्या विधानाला महत्त्व दिले आहे.

● ‘फायनान्शिअल टाइम्स’ने अमेरिका-भारताच्या वाढत्या लष्करी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामध्ये अत्याधुनिक एफ-३५ लढाऊ विमानाची भारताला देण्याच्या शक्यतेसह संरक्षण क्षेत्रातील इतर सहकार्याचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहे. बेकायदा मानवी तस्करी आणि मानवी हक्क्यांच्या मुद्द्यालाही माध्यमांनी महत्त्व दिले आहे. ‘ब्लूमबर्ग’ने भारत अमेरिकेकडून तेल आणि गॅसची आयात वाढविण्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे. याद्वारे दोन्ही देशांतील व्यापारी तूट कमी होण्याबरोबरच आयातशुल्क कमी होण्याची शक्यता आहे.

● ‘बीबीसी’ने या भेटीला केवळ प्रातिनिधिक पातळीवरचे रूप दिले आहे. व्यापारी मुद्द्यांवर फारशी प्रगती झाली नसल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मात्र, भेटीच्या या संधीचा फायदा दोन्ही देशांनी आपापले सामरिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी करून घेतला, असे म्हटले आहे.

● ‘एएफपी’ने भूराजकीय दृष्टिकोनावर भर दिला असून, या बैठकीद्वारे चीनच्या प्रभावाला काटशह देण्याची चाल अमेरिकेची आहे, असे भाष्य केले आहे. ट्रम्प यांचा करधोरणाचा फटका भारत, ब्राझील, व्हिएतनाम आणि इतर आग्नेय आशियायी आणि आफ्रिकी देशांना बसेल, असे भाष्य ‘सीएनएन’ने केले आहे. ‘फॉक्स न्यूज’ भारत आणि अमेरिकेतील वाढते संबंध दाखविले आहेत.

अमेरिकी रचनेच्या अणुभट्ट्या

●भारताबरोबर १६ वर्षांपूर्वी झालेल्या नागरी अणुकरारानुसार अमेरिकी रचनेच्या अणुभट्ट्या भारतात तयार करण्यात येणार आहेत. त्या दृष्टिने दोन्ही देश आता पुढे जातील.

●ऊर्जा सुरक्षेमध्ये दोन्ही देश परस्पर भागीदारीचा विस्तार करतील, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. तंत्रज्ञान हस्तांतराचाही यामध्ये विचार करण्यात येईल.

●मोदी-ट्रम्प भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. अणुभट्ट्यांमुळे नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची, यासंबंधी करण्यात आलेल्या कायद्यामुळे आण्विक सहकार्यात पुढे जाता आले नव्हते.

●मात्र, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अणुऊर्जा कायदा आणि नुकसानासंबंधी जबाबदारीचा कायद्यात सुधारणा करण्याची भारताने घोषणा केली. त्याचे दोन्ही देशांनी स्वागत केले.

मागा’ ‘मिगा’ = ‘मेगा’ भागीदारी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’च्या (एमएजीए, मागा) धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘मेक इंडिया ग्रेट अगेन’ (एमआयजीए, मिगा) अशी घोषणा केली. तसेच, ‘मागा’ आणि ‘मिगा’ मिळून दोन्ही देशांतील समृद्धीसाठी ‘मेगा’ भागीदारी होईल, अशी कोटी करून, याने दोन्ही देशातील संबंध नव्या उंचीवर जातील, असे वक्तव्य केले. ट्रम्प आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी शब्दांची ही कोटी केली.

अदानींवर चर्चा नाही

गौतम अदानींचा मुद्दा चर्चेत निघाला का, या प्रश्नावर मोदी म्हणाले, ‘भारत लोकशाहीवादी देश आहे आणि आमची संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी आहे. आम्ही सारे जग एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे, यावर मी विश्वास ठेवतो. अशा वैयक्तिक बाबींवर दोन देशांतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत नाही.’

‘परदेशातील वस्तूंवर अमेरिकेचा समान कर’

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी काही तास आधी अमेरिकेच्या परदेशताली वस्तूंवरील करधोरणातील बदलावर स्वाक्षरी केली. इतर देश अमेरिकी वस्तूंवर जितके आयातशुल्क लावतात, तितकेच दर अमेरिकाही संबंधित देशांच्या उत्पादनावर लावणार आहे. अमेरिकेच्या या धोरणाचा अमेरिकेचे मित्रदेश आणि इतर देशांवरही पडणार आहे. या निर्णयाने अमेरिकेचे इतर देशांबरोबरील व्यापारी असंतुलन संपेल, असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला.

भारत आणि अमेरिकेने उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला आणि यूएस-इंडिया रिलेशनशिप (ट्रस्ट)ची घोषणा केली. संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम, बायोटेक्नॉलॉजी, ऊर्जा आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य वाढवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.