श्रीलंकेतील मानवी हक्कांच्या पायमल्लीविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्का आयोगामध्ये अमेरिकेने मांडलेला ठराव गुरुवारी २५ विरूद्ध १३ मतांनी मंजूर करण्यात आला. भारतासह एकूण २५ देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. पाकिस्तानसह इतर १३ देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. एकूण ४७ देशांचा सहभाग असलेल्या आयोगामधील ८ देशांचे प्रतिनिधी मतदानावेळी अनुपस्थित राहिले. 
याच ठरावाच्या मसुद्यामध्ये भारताने हस्तक्षेप करून त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी द्रविड मुन्नेत्र कळघमने केली होती. त्यासाठी द्रमुकने दोन दिवसांपूर्वी केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचा पाठिंबा काढला होता. गुरुवारी या पक्षाच्या पाच केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे राजीनामे दिले आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचे राजीनामे मंजूर केले.
श्रीलंकेतील मानवी हक्कांची पायमल्ली आणि सामान्य नागरिकांचा बळी घेतल्याच्या प्रकरणाची निष्पक्ष आणि विश्वासार्ह यंत्रणेकडून तपास करण्यात यावी, ही मागणी आम्ही आयोगाकडे लावून धरली असल्याचे आयोगातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी दिलीप सिन्हा यांनी सांगितले.