* जवानांच्या हत्येने देशभरात संतापाची लाट  * पाकिस्तानचा कांगावा अन् गुर्मी मात्र कायम

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात घुसखोरी करून दोन भारतीय जवानांची गळे चिरून निर्घृण हत्या करण्याच्या पाकिस्तानी लष्कराच्या ‘सैतानी आणि संतापजनक’ दुष्कृत्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतानाच पाकिस्तानला चांगलीच तंबी दिली आहे. मात्र पाकिस्तानने या घटनेबाबत सपशेल कानावर हात ठेवले असून, भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सलमान बशीर यांनी, ‘पाकिस्तानकडून युद्धविरामाचे किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे कधीच उल्लंघन झालेले नाही,’ असा खोटारडेपणाचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खान यांनी तर त्याही पुढे जाऊन, या घटनेच्या त्रयस्थ चौकशीस पाकिस्तान तयार असल्याचे विधान केले आहे. पाकिस्तानच्या या गुर्मीमुळे भारत-पाक संबंधांतील कटुता वाढली आहे.   
बुधवारी दुपारी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सलमान बशीर यांना परराष्ट्र मंत्रालयातील आपल्या कार्यालयात पाचारण करून भारताचे परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविणारे अत्यंत कडक भाषेतील पत्र त्यांच्या हाती सोपविले. पाकिस्तान सरकारने या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. बशीर यांनी सायंकाळी या घटनेचे खंडन केल्यामुळे भारताचा संताप आणखीच पराकोटीला पोहोचला. या घटनेविषयी भारताने पाकिस्तानकडे अत्यंत स्पष्ट शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या असल्याचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले. अशा प्रकरणात सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यावर आपला भर असेल, असे खुर्शीद म्हणाले. दरम्यान, बुधवारी दुपारी पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करीत भारतीय सीमेत दोन सैनिकांना ठार केल्याच्या घटनेवर अँटनी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली.
 

      पाकिस्तानी सैन्याचे हे कृत्य चिथावणीखोर आहे. त्यांनी भारतीय सैनिकांशी केलेला प्रकार मानवतेला धरून नाही. आम्ही हा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित करणार असून, भारतीय लष्कराचे संचलन करणारे महासंचालक पाकिस्तानच्या समकक्ष अधिकाऱ्याशी बोलणी करतील. –  ए. के. अँटनी, संरक्षणमंत्री

Story img Loader