हिंदी महासागर आणि सुदूर परिसरात संरक्षण पुरविण्यास भारत समर्थ आहे. एकूणच संरक्षणाच्या क्षेत्रात भारत हे एक सामथ्र्यशाली राष्ट्र ठरू लागले आहे, असे भाष्य पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी येथे केले. भारताच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील सहकार्य करारांच्या व्याप्तीमुळे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आणि भांडवल यांच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. हिंदी महासागराच्या परिसरात शांतता टिकवणे ही भारताची जबाबदारी असून त्यासाठी समग्र सुरक्षा पुरविण्याची क्षमता आणि आत्मविश्वास आपण मिळवला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतात तसेच जागतिक परिस्थितीत वेगाने होत असलेले बदल लक्षांत घेता त्या वेगाशी जुळवून घेणे संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांना भाग आहे, तसेच देशात तंत्रज्ञानाच्या स्थित्यंतरांनंतर निर्माण होणाऱ्या संधीही त्यांनी साधल्या पाहिजेत अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
नवी आव्हाने आणि संधी यांच्या अनुषंगाने भारताच्या संरक्षण आणि सामरिक धोरणात आवश्यक ते बदल केले जाणे गरजेचे आहे, आणि या कामी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ निश्चितच मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पारंपरिक तसेच आधुनिक शस्त्रास्त्रांचा सामना करण्यासाठी भारत आता सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.