अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे या महिन्यात भारतभेटीवर येत असून, त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना अतिरेक्यांनी आखली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यास भारत पूर्णपणे समर्थ आहे, असा निर्वाळा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी येथे दिला. काही तरी दहशतवादी कृत्ये करून अतिरेकी बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही सज्ज आहोत, असेही पर्रिकर म्हणाले.
भारतातील शाळा, धार्मिक स्थळे, नागरी क्षेत्रे तसेच लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची पाकिस्तानी अतिरेक्यांनी योजना आखली असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले होते. त्यासंबंधी विचारले असता पर्रिकर यांनी उपरोक्त निर्वाळा दिला. पीर पांजाल विभागाच्या विरुद्ध दिशेने नियंत्रणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न २०० सशस्त्र अतिरेक्यांनी आखला असल्याचे लेफ्ट. जनरल के.एच. सिंग यांनी म्हटले होते.
जैश ए मोहम्मद व हिझबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या पाच कडव्या अतिरेक्यांचा दक्षिण काश्मीरमध्ये लष्कराने गुरुवारी खातमा केला. त्याचा संबंध ओबामा यांच्या भेटीशी नसल्याची माहिती पर्रिकर यांनी दिली. संरक्षण दलाचे अधिकारी माहिती मिळविण्याकामी यशस्वी ठरत असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यास भारत पूर्ण समर्थ -पर्रिकर
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे या महिन्यात भारतभेटीवर येत असून, त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना अतिरेक्यांनी आखली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
First published on: 16-01-2015 at 03:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India well prepared to thwart possible terror attack manohar parrikar