भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहू शकतो असं सांगत नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. अमित शाह यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी विजय संकल्प सभेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शाह यांनी सभेला सुरुवात केली. या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हजेरी लावली. त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी बोलताना अमित शाह यांनी देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचं सांगितलं. संपूर्ण देशभरातून फक्त नरेंद्र मोदींचंच नाव ऐकू येतं असून पाच वर्षात इतका विश्वास कसा काय निर्माण झाला ? ७० वर्ष देश ज्या नेतृत्वाची वाट पाहत होता ते नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रुपात मिळालं आहे असं अमित शाह यांनी म्हटलं.

अमित शाह यांनी यावेळी मतदारांना गुजरातला संपूर्ण 26 जागा जिंकून देण्याचं आवाहन केलं. पूर्ण बहुमताच्या सरकारचा संकल्प करा असंही त्यांनी सांगितलं. अमित शाह यांनी एअर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत सांगितलं की, ‘देशासमोर आज प्रश्न आहे की देशाला सुरक्षा कोण देऊ शकतं…देशाला सुरक्षा एकच व्यक्ती, एकच पक्ष देऊ शकतो ते म्हणजे नरेंद्र मोदी, भाजपा आणि एनडीएचं सरकार’.

अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगर हा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा मतदारसंघ असून यावेळी अमित शाह यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will be only safe in narendra modis hand says amit shah