भारत दौऱ्यावर आलेले मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीवला १.४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारत आणि मालदीवने हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षा संबंध अधिक बळकट करण्याचा संकल्प जाहीर केला. व्हिसा सुलभीकरणासह दोन्ही देशांमध्ये एकूण चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी चर्चा पार पडली. द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचा आम्ही निर्धार केला आहे असे पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषदेत सांगितले. परस्पराच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांसाठी आम्ही आमच्या देशाचा वापर करु देणार नाही असे मोदींनी सांगितले. मालदीवमधल्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताकडून १.४ अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य मोदींनी जाहीर केले.

आम्हाला मालदीवबरोबर चांगले व्यापारी संबंध हवे आहेत. भारतीय कंपन्यांना मालदीवमध्ये चांगली संधी आहे असे मोदी म्हणाले. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी सोली रविवारी भारतात दाखल झाले. महिन्याभरापूर्वी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

मालदीवच्या याआधीच्या राष्ट्राध्यक्षांनी चिनी कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. त्यामुळे या कठिण प्रसंगात मालदीवला सर्वात जास्त विश्वास भारतावर आहे. मालदीवच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला झुकते माप देऊन भारत विरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. चीनच्या महत्वकांक्षा पाहता रणनितीक दृष्टीने भारतासाठी मालदीव महत्वाचा देश आहे.